कोकणच्या इतिहासाचा साक्षीदार - तळगड

खूप दिवसांपासून काहीतरी वेगळे पाहायचे होते ,गड फिरून कंटाळा आला होता अशातच कुडा लेणी  आणि तिथून जवळ असलेला तळगड बद्दल वाचनात आले. मग काय ठरवले जायचे .... माझा कॉलेजचा एक मित्र रोह्याला राहत होता त्याचाकडे जाऊन मग त्याला सोबत घेऊन बाईक ने कुडा गाठायचे असा प्लान केला आणि एका रविवारी सकाळी ५.३० ला  सोबत 'BLACK BULL'( Access 125) घेऊन निघालो. मित्राच्या घरी सकाळी ८.३० ला पोचलो ....चहा घेऊन fresh झालो ,मित्राच्या आईने दिलेली शिदोरी घेतली आणि BLACK BULL ला किक मारून तळा आणि कुडे गावाकडे  कडे निघालो मित्राला सोबत घेऊन .....
Black Bull (Access125)
आम्ही रोहा-कोलाड-इंदापूर-तळा  असे जायचे ठरवले ,कारण इंदापूर ते तळा  गाव संपूर्ण निसर्गरम्य रस्ता होता  आणि तिथे फोटोग्राफी करणे सोडायची नव्हती.
इंदापूर-तळां रोड
इंदापूर पासून तळा गाव १५ कि मी वर आहे संपूर्ण घाटातील रस्ता आणि पावसाळ्यातील दिवस असल्याने सगळीकडे हिरवेगार झाले होते. आम्ही आजूबाजूला बघत, फोटो काढत तळा ला पोचलो तिथे मस्त गरमागरम  मिसळ खाल्ली ,मग  तळा गावात तळगड हा ऐतिहासिक शिवकालीन छोटा किल्ला पाहायला निघालो .त्याची तटबंदी अखंड अजून शाबूत आहे. मग काय ट्रेकर्स लोक आम्ही निघालो किल्ल्यावर !!!...
गडावर जाणारी वाट ..
तळगड किल्ला हा दक्षिणोत्तर पसरला आहे.जाताना गावातून काहींनी सांगितले कि वाट पावसाने खराब झाली असेल जागोजागी चिखल झाला असेल नीट जा .... वाट चढताना एक काका भेटले त्यांनी मग आम्हाला दरवाजापर्यंत वाट दाखवली ,दरवाजात पोचलो तर पावसाने आपली मोहीम उघडली ....हा पडलेला दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा होय ...इथे एका कोपऱ्यात भिंतीवर हनुमान कोरला आहे ...
दरवाजा पडीक अवस्थेत आहे , इथेच खडकात कोरलेले खांब टाके आहे ,बाजूलाच गंडभेरुडाचे शिल्प पडले होते.
गंडभेरुड
हनुमानाला नमस्कार करून थोडे फोटो काढून पुढे निघालो .....गवत खूप वाढले होते,पायाखालचे काहीच दिसत नव्हते ..... दगड पण खूप निसरडे झाले होते त्यावरून घसरून लोटांगण घातले.
दरवाजातून आत गेल्यावर गडमाथ्यावर जाण्यापूर्वी बांधीव पायऱ्या आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात.
ढोलकाठी
आम्ही ...... मग हळूहळू पुढे जात गडमाथ्यावर  आलो .....तिथेच वरती ढोलकाठी आहे.
गडमाथ्यावर उजव्या बाजूला दोन मजली भक्कम बुरूज पाहायला मिळतो.
वरती पोचल्यावर बघतो तर किल्ला धुक्यात वेढला होता ....मग काहीवेळाने धुक्याची चादर वाऱ्याने हटवली आणि समोर काही पडके अवशेष आणि कातळात खोदलेली २ पाण्याची टाकी दिसली ....
टाक्यातील पाण्यावर शेवाळ साचले होते,घाण साचली होती ... तिथून थोडे पुढे गेलो की छोटेसे शिवमंदिर आणि त्याला लागून पाण्याची ७ एकमेकात जोडलेली टाकी आहेत ....
त्या टाक्या सप्तमातृकाचे प्रतीक असावेत असे वाटले ....चावंड किल्ल्याची आठवण आली त्या टाक्या पाहिल्यावर ... त्याच्या पुढे एक पडीक इमारत दिसते ती लक्ष्मी कोठार नावाची वास्तू आहे ...गडावर अनेक ठिकाणी घरांचे आणि वाड्यांचे अवशेष आढळतात
पुढे उत्तरेकडे चालत गेल्यावर टोकावर बुरुज आहे इथे तटबंदी अजूनही शाबूत आहे...इथून मांदाड खाडीपर्यंतचा परिसर दिसतो ...पावसाळ्यात तर इथला परिसर अजूनच खुलतो ....बघताना डोळ्याचे पारणे फिटते ....किल्ल्यावरून घोसाळगड, मांदाड खाडी,. कुडा लेण्यांचा डोंगर असा सर्व परिसर दिसतो
इ.स.१६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून तळागड जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी जे १२ किल्ले स्वत:कडे ठेवले,त्यामध्ये तळगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. इ.स. १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला ...असा या किल्ल्याचा इतिहास .

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट