साद मराठवाड्याची भाग दुसरा..
साद मराठवाड्याची भाग दुसरा..
दिवस दुसरा.
बुलंद तोफांचे ऐश्वर्य लाभलेला परांडा किल्ला.
सकाळी लवकर उठून आम्ही जाण्याची तयारी केली. नाष्टा हॉटेल मध्येच असल्याने थोडा उशीरच झाला. नाष्टा झाल्यानंतर थेट उस्मानाबाद बस स्थानक गाठले. उस्मानाबाद स्थानकातून थेट परांडा बसेस आहेत त्यामुळे आमचा धावपळीचा प्रवास थोडा सुखकर झाला. साधारणपणे दोन अडीच तासाचा प्रवास करून आम्ही परांडा बस स्थानक गाठले. बस स्थानकाच्या मागच्या बाजूने गावातून एक छोटीशी वाट गडाकडे जाते. त्या वाटेने गावातून भटकंती करत आम्ही किल्याजवळ पोहोचलो.
बुरुजांमधून छोट्या छोट्या तोफा आपल्यावर नजर रोखून बसलेल्या दिसतात. आमचे दोन्ही फोटोग्राफर फोटो काढण्यात मग्न असताना माझा मोर्चा दरवाजाच्या तटबंदीवर जाण्यासाठी असलेल्या पायर्या कडे वळाला. वर चढून गेल्यावर दरवाजाच्या वरच्या बाजूस डाव्या बाजूला तटबंदीत वीरगळाचे अवशेष आहेत. ते पाहून पुढून खाली उतरलो.
पुढे आत शिरल्यावर एका मोठ्या बुरुजाने आमचा रस्ता रोखून धरला. तिथून पुढे एक वाट डावीकडे जाताना दिसली त्या वाटेने आम्ही किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीमध्ये शिरकाव केला. या तटबंदीत मोठ्याप्रमाणावर देवळातली कोरीव शिल्प निदर्शनास येतात. दोन तटबंदी मधील वाट पुढे थेट महादेवाच्या मंदिराजवळ जाते.
संपूर्ण किल्ल्याच्या आतल्या तटबंदीमध्ये जवळपास छोटेमोठे असे १९ ते २० बुरूज आहेत आणि प्रत्येक बुरुजांना तोफांचे ऐश्वर्य लाभले आहे. शेवटच्या दरवाजामधून आत शिरल्यावर उजव्या हाताला एक मशीद लागली तिच्याकडे तिरकस नजर करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. पुढे तीन चार खोल्या लागतात त्यात वटवाघळांनी हैदोस घातला आहे. त्यातल्याच एका खोलीमध्ये पंचधातूच्या तोफा आणि तोफगोळे ठेवलेले आहेत त्यांना सुंदररित्या रंगवण्याचे काम वटवाघळांनी केलेले आहे.
तिथून पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक छोटेसे मंदिर आहे मंदिर बंद असल्याने ते काही पाहता आले नाही परंतु किल्ला फिरण्यापूर्वी केलेल्या अभ्यासावरून ते गणपती मंदिर असावे. ते पाहुन आमचा मोर्चा पुढे असलेल्या तिन मजली विहिरीच्या दिशेने वळाला.
विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि आतमध्ये विहिरीच्या सभोवताली खुप सारे कोनाडे आहेत. तिथून पुढे विहिरीच्या मागच्या बाजूला असलेल्या हमामखान्याची भटकंती करून आम्ही किल्ल्याचा कोणतातरी एक बुरूज पकडून भटकंती करण्याचा निर्णय घेतला. प्रथम किल्ल्याच्या उजव्या बाजूकडील कोपऱ्यातील एका बुरजाच्या दिशेने आमचा मोर्चा वळाला. बुरुजावर गेल्या गेल्या आमच लक्ष वेधून घेतले ते तिथे असणाऱ्या बुलंद अशा पंचधातूच्या तोफेने आणि आमच्या येवढ्या मोठ्या भटकंतीचे सार्थक झाल्यासारखे वाटले.तोफेवर सुंदर असे फारसी लेख कोरलेले आहेत ते पाहून आम्ही पुढील बुरुजाकडे कूच केली. त्या बुरुजावर सुद्धा अशाच प्रकारची पंचधातूची तोफ निदर्शनास पडली. ते पाहून आमची स्वारी विहिरीच्या मागील बाजुस असलेल्या साधारणपणे दहाव्या बुरुजावर पोहोचली तिथे एक गोल घुमट असलेली दुमजली इमारत आहे कदाचित तो त्या वेळेचा हवामहाल असावा.
तेथून पुढील बुरजावर दोन कड्या असलेली एक मोठी बांगडी तोफ आहे. एक एक बुरूज पार करत आमचा मोर्चा मशिदीच्या बाजूला असलेल्या बुरुजावर पोहोचला. या बुरुजावर अप्रतिम अशी मलिक ए मैदान तोफ आहे या तोफेवर अरबी भाषेतील लेख आहेत त्यातील एक लेख तोफेच्या तोंडावर कोरलेला आहे. तोफेवर दोन सिंह आहेत परंतु आपले दुर्दैव कि त्यातील एक सिंह लोकांनी कापून नेला आहे ते पाहून दुख: झाले.त्या बुरुजांवरुन खाली उतरून आम्ही बुरुजाच्या बाजूला असलेल्या मशिदीत शिरलो. मशिदीची अंतर रचना पाहता पूर्वीच्या काळी ते मंदिर असावे असे भासत होते. मशिदीला एकूण ३६ खांब आहे त्यावर सुंदर कलाकुसर केली आहे.
आणि छतावर सुद्धा काही ठिकाणी कलाकुसर केलेली आढळते. ते पाहून मशिदीच्या समोर जो वझु करण्यासाठी टाक्या ठेवलेल्या आहेत तिथे आम्ही सुद्धा वझु केला आणि किल्ल्यातून काढता पाय घेतला कारण पुढील प्रवास खूपच लांबचा होता.
पुन्हां एकदा परांडा बसस्थानक गाठले आणि पुन्हां आमचा परांडा सोलापूर प्रवास चालू झाला.
क्रमशः
साद मराठवाड्याची भाग 3 लवकरच...
महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.











छान , तोफा तर अप्रतिम आहेत अश्या रेखीव तोफा मी अजून तरी पाहिलेल्या आठवत नाही.
उत्तर द्याहटवा