साद मराठवाड्याची भाग १...

 राठवाड्यातील भूईकोट किल्ले हे बऱ्याच वर्षांपासून प्रशासनाच्या आणि पुरातत्त्व खात्याच्या दृष्टीकोनातून दुर राहिले असावेत.

     सध्या पिकनिक पॉईंट म्हणून प्रसिद्धीस आलेला नळदुर्ग पहाण्याची खूप इच्छा होती. परंतु मुंबईतुन मराठवाडा गाठायचा म्हणजे भटकंती कमी आणि प्रवास जास्त असे काहीसे होते. आणि अचानक विशालचा फोन आला. आम्ही नळदुर्ग परांडा प्लान करतोय तु येशील का? ज्याची वाट बघत होतो ते काहीच मेहनत न करता जर अचानक पदरात पडत असेल तर कोणाला नको असेल का? आणि ते हि काहीही मेहनत न करता. लगेच त्याला होकार कळवला.
नंतर आमच्या ग्रूप मध्ये कळवले कि मि मराठवाडा भटकंती साठी चालो आहे त्यामुळे त्या तारखेला आपला काही मुहूर्त काढू नका.
आणि तयारी चालू केली. थोड्या दिवसांनी कुणाल चा फोन आला आणि कसे जाणार आहात काय काय ठिकाण पाहणार आहात ते जाणुन घेतले. आणि बोलता बोलता आमचाच एक स्वतंत्र प्लान तयार झाला आणि आम्ही तिघे (कुणाल, मि आणि प्रथमेश) भटकंती करायला जायचे ठरले. आणि त्यानुसार सगळी हालचाल चालू झाली. प्रथम नळदुर्ग, परांडा, सोलापूरचा भूईकोट करण्याचे ठरवून आम्ही नियोजन केले. आणि प्रथमेशला मुंबई-बार्शी, सोलापूर-मुंबई असे ट्रेनचे बुकिंग करायला सांगतले. आणि त्यानुसार त्याने बुकिंग केले सुद्धा नंतर त्याचा मेसेज आला कि जातांनाचा बुकिंग बार्शी पर्यंत करायचे होते परंतु चुकून ते लातूर पर्यंत झाले आहे.
मग काय परत सगळी सूत्र फिरली आणि आमच्या मराठवाडा यादीत लातूर मधील किल्ले पण जमा झाले. बाकी सगळा प्लान तयार होता आता आतूरता होती १७ आक्टोबरची.
  ठाण्यावरून लातूरला जाणारी ट्रेन रात्री ९:१५ ची होती. परंतु कुणाल आणि मला जायची इतकी घाई त्यामुळे आम्ही लवकरच ठाणे गाठले. तरी ट्रेन सीएसटी वरुन सुटली नव्हती.  थोड्या वेळाने प्रथमेश चा फोन आला गाडी दादर वरुन निघाली आणि आमची उत्सुकता वाढली. थोड्या वेळाने आम्हाला लातूर एक्सप्रेसचे दर्शन झाले.
तिघे भेटल्यावर मग आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. गप्पाच्या नादात कर्जत केव्हा गाठले कळालेच नाही. आम्ही भानावर येइपर्यंत बहुतेक प्रवासी निद्रिस्त झाले होते. एव्हाना रात्रीचे ११ वाजून गेले होते. मग आम्ही सुध्दा झोपण्याचा निर्णय घेतला. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा ट्रेन लातूर च्या अलीकडे होती.  

सुर्याच्या आगमनाची चाहूल.

खिडकी उघडून बाहेर पाहिले तर एक नयनरम्य दृश्य दिसले. नुकताच पाऊस पडून गेला होता आणि सूर्योदयाची चाहूल देत आकाशात तांबडं फुटायला लागले होते. हे दृश्य डोळे भरून पाहिल्यानंतर आठवणीचा ठेवा म्हणून ते क्षण कॅमेरा मध्ये बंदिस्त केले. या सगळ्यात लातूर केव्हा आले समजलेच नाही.



आलेल्या पाहुण्यांचे लातूर स्टेशन वर स्वागत.

दिवस पहिला.....
साधारणपणे सकाळी ६:३०च्या आसपास ट्रेन ने लातूर आल्याचे संकेत दिले. आमचा या पुढील प्रवास लालपरी ने असल्याने आता आम्हाला लातूरचे बसस्थानक गाठायचे होते ते रेल्वे स्टेशन पासून साधारणपणे ५ कि.मी. होते. बसस्थानक गाठण्यासाठी आम्ही स्टेशन च्या बाहेर निघालो तर जणू आमच्या निश्चित स्थळी पोहचवणारी बस आमचीच वाट पाहत उभी होती. नंतर समजले लातूर मधून परगावी जाणाऱ्या सर्व गाड्या लातूर रेल्वे स्टेशन वरुन सुद्धा सुटतात. मग आमचा लातूर उदगीर असा प्रवास चालू झाला. लातूर शहरातून बस बाहेर निघेपर्यंत चा प्रवास ठीक होता परंतु नंतर चंद्रावरील प्रवास चालू झाला त्यातच जोडीला बस च्या खिडक्याचा कर्णकर्कश आवाज प्रवास अजूनच आनंदमयी करत होता. जवळपास दीड दोन तासानंतर एकदाची उदगीर बस स्थानकात या संपूर्ण आनंदमयी प्रवासाची सांगता झाली. उतरल्यानंतर प्रथमेश ने पुढील ठिकाणी जाणाऱ्या गाडीची चौकशी केली.  नेहमी प्रमाणे कोलगेट साठी दुसऱ्याच्या भरोस्यावर येणारे तिघे सुध्दा कोलगेट घरीच ठेवून आलो. मग काय लगेच आमच्यातला ट्रेकर जागा झाला आणि सरळ नाष्ट्याची सोय बघितली.  


किल्ले उदगीर च्या दिशेने.

आणि उदगीर किल्याच्या दिशेने रवाना झालो. किल्ला उघडण्याची वेळ जरी ९ ची असली तरी किल्लेदार मात्र आपल्या सोइनुसार येतात त्यामुळे आम्हाला किल्ला बघायला भेटतो कि नाही अशी मनात शंका आली. 


किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार.

   मग पुन्हां आम्ही किल्लेदारच्या शोधात निघालो तर गावातल्या मंडळींनी सांगितले थोड्या वेळात उघडतील. किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरील परिसराचा हागणदारी साठी वापर होतो त्यामुळे आम्ही सभोवताली फिरणे टाळले. किल्ला भूईकोट असला तरी, किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे. तर उरलेल्या चौथ्या बाजूने मोठे खंदक तयार केले आहे संरक्षणाच्या दृष्टीने त्याकाळी त्यात पाणी भरले जाई.
                 फोटो झूम करून पहावा.
किल्ल्यात आत शिरण्यासाठी एक भव्य दक्षिणाभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूंना दोन भव्य बुरूज आहेत. यातील उजव्या बाजूच्या शेवटच्या बुरुजावर शरभ शिल्प व हत्तींची झुंज अशी दोन शिल्प आहेत. 

   थोड्या वेळात किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उघडले परंतु आतले प्रवेशद्वार उघडे नसल्याने आम्हाला सहज किल्ल्यात प्रवेश मिळाला नाही त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारातून आत शीरल्या नंतर उजव्या बाजुची वाट एका उदगीर महाराजांच्या मठात जाते. 



त्या वाटेने पुढे गेल्या नंतर एका बुरुजावरून मागच्या बाजूला असलेली हिरवीगर्द झाडी आणि पक्षांची किलबिल लक्ष वेधून घेते होते. त्यातच करडा धनेश या पक्षाच्या दोन जोड्यांनी आमचं लक्ष वेधून घेतले. सर्व पक्षाचे मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही पुन्हा किल्ल्याच्या दिशेने निघालो. किल्ल्याच्या दरवाजा जवळ येउन बघितले तरी पण दरवाजा बंदच होता. आता मात्र  आपल्याला किल्ल्याचे मुख दर्शन घेऊन जावे लागणर असे वाटत होते. आजूबाजूला पाहिले असता एक व्यक्ती दिसली त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी किल्ल्याचे दार उघडून दिले आणि आमच्या जिवात जिव आला. आणि खऱ्या अर्थानेआमची किल्ला बघायला सुरुवात झाली.
      *किल्ला आकारमानाने खूपच अवाढव्य आहे त्यामुळे किल्ला बघताना कोणत्याही एका बाजूने किल्ला बघायला सुरुवात करावी जेणेकरून किल्ला व्यवस्थित पाहता येतो. *

       किल्ल्याचा दुसरा दरवाजा ओलांडून आत दोन्ही बाजूला सैनिकांच्या देवड्या आहेत. त्याचे बांधकाम पाहता ते मुघल शैली चे आहे असे दिसून येते. पुढे मोकळ्या जागेत एका लाकडी गाड्यावर मकर तोफ आपले स्वागत करते.  


किल्ल्यात प्रवेश मिळाल्या नंतर तुमच्यावर
 नजर रोखून असलेली तोफ.

ते पाहून पुढे उजव्या बाजूने आम्ही किल्ला बघायला सुरुवात केली. केलेल्या अभ्यासानुसार आम्ही विहरीच्या शोधात निघालो परंतु विहीर तर नाही सापडली परंतु एक सुंदर नक्षीकाम केलेल्या कारंज्याने मात्र आमचे लक्ष वेधून घेतले.  


कारंजा.

      पुढे डाव्या बाजूला एक दुमजली बुरूज आहे.  या बुरुजावरून किल्ल्यातील सर्व भागांवर व किल्ल्याच्या बाहेर दूरवर नजर ठेवता येत असेल असा आम्ही अंदाज बांधला. याच्याच पुढील बाजूस दोन महल आहेत. त्यातील एक बेगम महल आहे त्या महलाच्या एका भिंतीवर छोटेछोटे चौकोनी कप्पे दिसले आम्हाला आधी वाटले कि ते टपाल कार्यालय वगैरे असावे परंतु नंतर समजले कि कबूतर हे प्रेमाचे प्रतीक मानले जायचे त्यामुळे त्या जागी कबुतरांसाठी खुराडे बनवले होते.


कबुतरांचे खुराडे.

बेगम महालाच्या बाजूला खास महाल आहे. या महाला समोर एक हौद. या दोन महालांना लागून धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारती मधून जाणाऱ्या रस्त्याने गेल्यावर खास महालाच्या मागे असलेला नर्तकी महाल आहे. नर्तकी महालातून पश्चिमेच्या तटबंदीच्या कडेकडेने प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीतच ३ मजली हवा महाल आहे. हि किल्ल्यांची उजवी बाजू फिरून आम्ही किल्ल्याच्या डाव्या बाजूच्या दिशेने निघालो.


महल.

तर किल्ल्याच्या चौथ्या प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस डाव्या हाताच्या भिंतीत छोटा दिंडी दरवाजा व आत जाण्यासाठी वळण रस्ता (भूयार) आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद असतांना दिंडी दरवाजाचा उपयोग केला जात असे असा अंदाज येतो. या दरवाजातून आत गेल्यावर उजव्या बाजूला पूरातत्व खात्याचे कार्यालय असून त्याच्यावरील मजल्यावर अप्रतिम सज्जा आहे. तेथे जाण्यासाठी डाव्या बाजूने वाट आहे. डाव्या बाजूला काही पायऱ्या चढून गेल्यावर ५ कमानी असलेल्या तहसील कार्यालयाची इमारत आहे. याच्या मधल्या कमानी समोरील भिंतीवर हिसाम उल्ला खान याने लिहिलेला काव्यात्मक फारसी शिलालेख पहायला मिळतो. तहसील कार्यालयातून वर चढून पहिल्या मजल्यावर गेल्यावर समोरील दालनात दोन पट्ट्यांवर  जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारा फारसी शिलालेख कोरलेला आहे .
         डोळ्याच्या आकाराचा कारंजा .
या दालनातून बाहेर निघून उजव्या बाजूला दुसरे दालन आहे. या दानलाच्या मधोमध डोळ्याच्या आकाराचा कारंजा आहे. 

तर भिंतीत अप्रतिम सज्जा आहे. या दालनतून बाजूच्या गच्चीवर जाण्यासाठी कमानदार दरवाजा आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजूला ७ ओळींचा फारसी शिलालेख कोरलेला आहे .



     या शिलालेखाच्या चारही बाजूच्या पट्टीवर नक्षी काढलेली दिसते, पण ती नक्षी नसून कुराणातील अल्लाची नाव कोरलेली आहेत असे समजते. या प्रवेशव्दारवर एक अरबी शिलालेख आहे पण तो अस्पष्ट झाल्याने तो समजून येत नाही.
                फारसी शिलालेख.
दरवाजातून बाहेर गच्चीवर गेल्यावर उजव्या बाजूला भिंतीत अनेक चौकोनी कोनाडे दिसतात, ते कबूतरे ठेवण्यासाठी केलेले असावे असा आम्ही अंदाज बांधला. त्याच्यापुढे ५ कमानी व पंधरा खांबांवर तोललेला रंग महाल आहे. पुढे जीन्याने खाली उतरल्यावर आपण ३ कमानी व ६ खांब असलेल्या महालात पोहोचतो. याच्या मधल्या कमानीवर बाहेरच्या बाजूने एक फारसी शिलालेख लिहिलेला आहे.


तिथून पुढे आमची वारी
चांदणी बुरुजाकडे वळाली. या बुरुजावर एक झेंडा व २ प्रचंड मोठ्या तोफा आहेत. यातील एक बांगडी तोफ आहे. दुसरी तोफ पंचधातूची आहे.

या तोफेच्या तोंडाकडे मगरीचे (मकर मुख) कोरलेले आहे तर मागिल बाजूस सूर्याचे मुख कोरलेले आहे. या तोफेवर अरबी भाषेतील २ शिलालेख कोरलेले आहेत.
चांदणी बुरुजावरून आम्ही किल्ल्याला नमस्कार करून किल्ल्याचा निरोप घेतला.




बुरुजावरुन दिसणारे दृश्य.




चांदणी बुरुजावर जाण्या मार्ग.

आणि थेट बस स्थानकाच्या दिशेने धाव घेतली कारण आम्हाला पुढे औसा किल्ला भटकंती साठी जायचे होते.
बस स्थानकात येउन सकाळी अर्धवट घेतलेली माहिती पूर्ण केली. तिथे येउन चौकशी केली असता समजले कि औसा किल्ल्याच्या च्या दिशेने जाणाऱ्या बस दुपारी १२ पर्यंतच असतात. आणि नाईलाजाने आम्हाला औसा किल्ल्याकडे पाठ फिरवावी लागली.
मग आमचा पुन्हां उदगीर-लातूर-उस्मानाबाद असा प्रवास चालू झाला.


बस मधून काढलेला फोटो.


दिवसभराच्या धावपळीनंतर तृप्त झालेला आत्मा.


क्रमशः
साद मराठवाड्याची भाग २ लवकरच...

महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट