अकोलेचे श्री गंगाधरेश्वर मंदिर


 अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गाव प्रवरा नदीकाठी वसलेले आहे. या ठिकाणी एकेकाळी अगस्ती ऋषींचा आश्रम होता. सध्या या ऋषींचे मंदिर गावात आहे. पण आम्हाला सिद्धेश्वर आणि गंगाधरेश्वर मंदिरे पाहायची होती. 

जिना असलेले प्रवेशद्वार 


    अकोले गावामधून गावठान-सिन्नर रस्त्याने जाताना उजव्या बाजूला मॉडर्न आणि ज्ञानवर्धिनी शाळेच्या बाजूने एका छोट्या गल्लीमध्ये एका उंच दगडी जोत्यावर हे मंदिर बांधले असेल असा अंदाजही येत नाही. हे एक खाजगी मंदिर आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करायला दोन प्रवेशद्वार आहेत. एक जिन्याने चढून येणाऱ्या दरवाजाने आणि दुसरा मागच्या बाजूच्या दरवाजाने.आम्ही गेलो तेव्हा जिन्याचा दरवाजा कुलूप लावून बंद केला होता मग थोडे पुढे मंदिराला वळसा घालून दुसऱ्या दरवाजासमोर उभे ठाकलो. सध्या हे प्रवेशद्वार वापरात आहे. .

येथून जिन्याने मंदिरात प्रवेश 
दुसरे प्रवेशद्वार 



















दरवाजावर लिहिले होते श्री.पोतनीस(संत) यांचे खाजगी मंदिर- सर्वाना मुक्त प्रवेश.मंदिरच्या परिसरात काही जुने वाडे आहेत.
जुना वाडा 












    या मंदिराची देखभाल श्री.धर्मधिकारी करतात, त्यांचे घर मंदिराच्या बाजूला आहे.
वाड्याचे प्रवेशद्वार 

मंदिराची एकूण बांधणी पहिली तर हे पेशवेकाळात बांधले गेले असावे. त्यावर फारसे कोरीवकाम आढळत नाही. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर खूप शांत आणि प्रसन्न वाटते. मंदिराच्या बाह्यभिंतींवर कोरलेली फुले,कमळे आणि कीर्तिमुख हे कोरीव काम उत्तम आहे.  मंदिराचे सभागृह  ,अंतराळ आणि गर्भगृह असे तीन भाग पडतात.


    

 



     ऐतिहासिक कागदपत्रे आणि बॉम्बे गॅझेटियरनुसार हे मंदिर शके १७०३ म्हणजे इ .स.१७८२ मध्ये श्री.कृष्णाजी अंबादास पोतनीस (संत ) यांनी बांधले. शिल्लक राहिलेले मंदिराचे बांधकाम त्यांचे चिरंजीव श्री.अमृतराव कृष्णाजी पोतनीस यांनी पूर्ण केले. 
    मंदिर खर्च अंदाजे रु.४ लक्ष (लाख ) झाला. देवालयाची उंची ५४ फूट असून लांबी ७५ फूट व रुंदी ३५ फूट आहे. मंदिराच्या बांधकामास वापरलेला दगड प्रवरेकडील टेकड्यांवरून गाड्यावर वाहून आणण्यात आला आहे. हे मंदिर विमानपद्धतीच्या वास्तुशात्राचा एक सुंदर नमुना आहे. मंदिराचे बांधकाम जयपुर -राजस्थानकडील कारागिरांनी केले आहे. 

    .

           




मंदिराचे बांधकाम चुन्यात नसून काही ठिकाणी लोखंडी पट्ट्यांचा वापर केला आहे. उत्तर हिंदुस्थानी ,ब्राह्मणी अशा विविध रचनांचा संगम येथे झाला आहे. तिन्ही बाजूस शिखरांवर ध्यानस्थ शिवाच्या मुद्रा मोहक आहेत





मंदिराचा सभामंडप १२ खांबांवर तोललेला असून, छताचा भर तोलण्यासाठी दोन खांबांमध्ये कमानीचा वापर केला आहे. तिन्ही बाजूंनी सभामंडप उघडा असून त्याला भिंती नाहीत. सभामंडपाचे छत कमी कमी होत जाणाऱ्या गोलाकार पट्ट्या एकमेकांवर रचून बनवलेले आहे. मध्यभागी उलटे लटकणारे दगडी फुल कोरलेले आहे. मंडपाच्यावर छोटा कळस आहे. गर्भगृहाच्या वरील कळस छोट्या छोट्या कळसांनी मिळून बनलेला आहे.




असे हे सुंदर मंदिर पाहून आम्ही टाहाकारीच्या जगदंब मंदिराकडे निघालो . जर तुम्ही अकोलेमध्ये आलात तर हे सुंदर ,साधे मंदिर बघायला अजिबात विसरू नका.











टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट