स्वराज्याची पहिली राजधानी.
राजियांचा गड राजगड.....
योगायोगने राजगडला जाण्या चा मुहूर्त २०२० सालाच्या सुरुवातीलाच ठरला. गेल्या वर्षांचा शेवट आणि नवीन वर्षांची सुरुवात स्वराज्याच्या पहिल्या राजधानीने झाली.
ठरल्या वेळेत एक एकजण यायला सुरुवात झाली. परंतु ठरल्या नुसार सगळे आले तर नवलच. यावेळी तर गाडी पण वेळेवर होती. परंतु आमच्यातल्या एकाने तब्बल तासभर उशीरा हजेरी लावली त्यामुळे सुरुवातीलाच वेळेचे गणित कोलमडले. साधारणपणे रात्री १२ च्या सुमारास गणपतीच्या जयघोषात गाडी गुंजवणे गावाच्या दिशेने वळाली. हवेत बऱ्यापैकी गारवा असल्याने सगळ्यांनी खिडकीच्या काचा बंदच ठेवल्या होत्या.
भल्या पहाटे गुंजवणे गाठले. धुक्यामुळे संपूर्ण गाव गोठलेले होते. त्यामुळे कोणाला त्रास न देता ड्रायव्हर दादांची जेवणाची सोय दाखवून दिली आणि एक छोटीशी ओळखपरेड घेऊन रूट बद्दल थोडी माहिती सांगितली आणि सगळ्यांनी आपल्या ब्यॅगा पाठीशी लावल्या. मी नोव्हेंबर महिन्यात या रूट वर राजगड-तोरणा-रायलींग पठार-बोराट्याची नाळ-लिंगाणा असा जंबो ट्रेक केला होता त्यामुळे बऱ्यापैकी रस्ता माहिती होता म्हणून मी वाटाड्या झालो तर कुणाल मागे राहिलेल्यांना गोळा करून घेउन येणार होता. पहाटे ४:२३ ला गुंजवणे गावातून ट्रेकचा श्रीगणेशा झाला.
सगळेजण ताज्या दमाचे असल्याने सुरुवातीला सगळेच एकत्र होते नंतर हळूहळू झाडाची पाने जशी गळतात तसे एकएक जण कमी कमी व्हायला लागले त्यामुळे पहिला टप्पा पार केल्यावर आम्ही पाठीमागचे येइपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. सगळे आल्यानंतर समजले कि आमच्यातल्या एकीने वाढत्या अंगाचे ट्रेकिंग शूज घेतले पण ट्रेकला येइपर्यंत पाय वाढलेच नाही आणि त्यामुळे चालताना तिला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला.
पहिल्या टप्यात आल्यावर कुणाल ने तिच्या शूजची लेस घट्ट करून पुढे मार्गस्थ झालो. तो थेट दुसरा टप्पा पार करुनच आमची गाडी थांबली. आता तिसरा म्हणजे शेवटचा टप्पा बाकी होता तोही पूर्णपणे कातळ टप्पा असल्याने सगळे येण्याची वाट बघत एका मागे एक उभे होतो कारण वाट अरुंद आणि कातळात खडी चढाई होती. थोडा वेळ झाल्यानंतर कुणाल ला आवाज दिला तो हाकेच्या अंतरावर आहे हे कळल्यावर आमचा मोर्चा चोर दरवाजाच्या दिशेने वळाला. चोर दरवाजाच्या आधिचा उभा कातळटप्पा रेलिंग धरून कसा बसा पार केला आणि सकाळी ६:१६ ला चोर दरवाजा जवळ येउन ठेपलो.
खरोखरच चोर दरवाजातून चोरासारखेच आता शिरावे लागले त्यात आमच्या कंबरेइतक्या उंचीच्या ब्यॅगा कश्याबश्या कवायत करत आतमध्ये शिरवुन सगळे येण्याची वाट पाहत उभे होतो.
तोपर्यंत सुवेळा माचीच्या दिशेला आकाशात तांबडे फुटायला सुरुवात झाली होती जणू सुवेळा माची पूर्वेला हात दाखवून आम्हाला सांगत होती चला सुर्यनारायण यायची वेळ झाली. परंतु थकलेले असल्याने बऱ्याच जणांनी पाठ फिरवली.
तर काही हौशीनी वरती टेपाडावर चढून फोटो काढले. आणि आम्ही पद्मावती मंदिराच्या दिशेने वळालो. मंदिर तसे रिकामे होते त्यामुळे सगळ्यांनी पथारी अंथरली. आम्ही सकाळच्या नाष्ट्याच्या तयारी च्या मागे लागलो गरमागरम उपमा आणि गरमागरम चहा. बरेचसे ट्रेकर आपल्या ब्यॅग मध्ये ओझे नको म्हणून दुसऱ्याच्या ब्यॅग मधल्या सामानाच्या भरोश्यावर आले होते मग सकाळच्या नष्ट्या साठी हात पसरवण्यास सुरुवात झाली. चहा साठी पण तिच परिस्थिती. आणि त्या पेक्षा वेगळी आमची परिस्थिती होती जेवणाच्या सामानाच्या भराभरीत चहा गाळायची गाळणी आणायला विसरलो मग काय आपला गावठी उपाय करून भागवले.
अंधारी वाट .
हेच ते वाढत्या अंगाचे शूज
चोर दरवाजाची वाट
चहा गाळण्याची नवीन पध्दत
नंतर आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. सदरेच्या पुढील बाजूने तिन वाटा फुटतात त्यातील उजव्या बाजूची वाट संजीवनी माचीवर जाते तर डावीकडील वाट सुवेळा माचीवर जाते तर मधील वाट बालेकिल्ल्यावर जाते. त्या वाटेने पुढे गेल्यावर कातळात मधमाशांचे मोहोळ निदर्शनास पडले तिथून पुढे गेल्यावर एक लुटारू टोळी आमची येण्याची वाट बघत बसली होती.
आणि ते देखील अशा ठिकाण उभे होते ज्या ठिकाणावरुन तुम्ही पळून सुध्दा जाउशकत नाही. म्हणजे सावज अगदी आरामत जाळ्यात येइल आणि आरामात लुटता येइल. जे त्यांच्या तावडीत भेटले त्यांना लुटले बाकीचे कसे बसे बालेकिल्ल्याच्या महादरवाजा पर्यंत पोहोचले.
तिथे इतिहासकाराने सगळ्यांच्या डोळ्यासमोर यथेच्छ घडलेला इतिहास उभा केला. तिथून पुढे आमची गाडी चंद्रकोर टाक्याकडुन उत्तर बुरजाला जाऊन धडकली. तिथून थोडे वर चढून आम्ही राजवड्याच्या दिशेने वळालो.
अरे सोड काही नाही माझ्याकडे
लुटारू टोळी
बालेकिल्ल्या वरील बांधकाम पाहुन त्या वेळी काय राजवैभव असेल याची फक्त कल्पनाच करावी लागेल. ते सर्व वैभव पाहून आम्ही पुन्हां परतीच्या मार्गाला लागलो कारण सकाळचा नाष्टा जिरून भुकेने पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली. त्यामुळे पटकन पुढे येउन जेवणाची तयारी केली. सगळ्यांनी जेवणावर ताव मारून पथारी पसरली. आम्ही बाकीची आवरा आवर करून पुढच्या तयारीला लागलो. तासाभराच्या विश्रांती नंतर पुन्हां पुढील मोहीमेसाठी सज्ज झालो.
पाली दरवाजा
पुढील प्रवास पाली दरवाजाच्या दिशेने चालु झाला. वाजेघर मधून पाली दरवाजा कडे येणारी वाट आता पूर्णपणे वाढवून अगदी पाली दरवाजाच्या खालपर्यंत मोठ्या गाड्यांची पार्किंग आणलेली आहे. दुख: या गोस्टीचे वाटते कि कालांतराने याच गाड्या राजगडावर फिरतांना दिसतील. आणि मग राजगडचे राजमाची व्हायला वेळ लागणार नाही. पाली दरवाजा जवळ एक अस्पष्ट शिलालेख निदर्शनास आला.
त्या शिलालेखाचा अनुवाद या आधी कोणत्याही पुस्तकात वाचण्यात आलेला नाही. तिथून पुढे आमचा मोर्चा संजीवनी माचीच्या दिशेने वळाला. माचीवर जातांना निट डोळे उघडे ठेवून भटकंती केल्यास माचीच्या तटबंदीवर व्याघ्रशिल्प, शरभशिल्प पहायला मिळतात.
नंतर आम्ही दोन तटबंदीच्या मध्ये उतरून सुवेळा माचीच्या दिशेने निघालो जेमतेम एक माणूस चालत जाईल येवढीच जागा होती. त्या दोन तटबंदीच्या मध्ये सिंह मुख निदर्शनास आले ते पाहून तटबंदी च्या आतमध्ये उतरण्यासाठीचा केलेला खटाटोप सार्थकी लागल्याचे समाधान झाले.
पुढे सर्वजण सुवेळा माचीवर बसून सूर्य अस्थाला जाण्याची वाट बघत बसले तर आम्ही चार टाळकी आणखी काही शोध लागतोय का यासाठी खटाटोप करत होतो. सुर्यनारायणाला निरोप देउन आम्ही पुन्हां पद्मावती मंदिर गाठले तर जणू पद्मावती माचीला जत्रेचे स्वरूप आले होते. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला तर आमच्या ब्यॅग सरकवून लोकांनी आपली पथारी पसरली होती. भल्या पहाटे येउन जागा पकडण्यासाठी केलेली धडपड व्यर्थ गेली. येव्हाना बाहेर अंधार पडला होता आणि पद्मावती माची जत्रेचे रुप धारण करत होती जागोजागी टेंट लागायला सुरुवात झाली होती. सगळ्यांच्या तंबू समोर चुली पेटल्या होत्या. सगळीकडे गोंगाट गाण्यांचा आवाजामुळे सगळीकडची शांतता भंग पावली होती.
पिकनिक म्हणून राजगडावर आलेल्यांनी चिकनची पातेली चुलीवर चढवली तर काहींनी बार्बेक्यु ची तयारी चालू केली. तरी आमची जागेसाठी धडपड चालूच होती. शेवटी जागेचा विचार सोडला आणि पेटपुजेच्या तयारीला लागलो. कुणाल आणि अतुल बाहेर शेकोटीत पापड भाजयला गेले. आणि मि बाकीच्या तयारीला लागलो.आम्ही १७ जण असल्याने पातेल्यात एकदाच जेवण होणे शक्य नव्हते त्यामुळे एक पातेलाभर शिजवून पुढे केला आणि दुसरा पातेला ग्यॅस वर चढवला. सगळ्यांना वाटले पहिलाच संपणार नाही तर दुसरा कोण खाणार परंतु दुसरा पातेला शिजेपर्यंत पहिला पातेला रिकामा झाला होता.
बाकी राहिलेल्यांनी दुसऱ्या मेजवानीवर आडवा हात मारत असतांना मंदिराच्या एका कोपऱ्यात एक आज्जी झोपलेली दिसली तिला झोपेतून जागे करणे योग्य वाटत नव्हते परंतु राजगडावरील जत्रा पाहता (सगळे बीसलेरी चे पाणी पिणारे होते) तिच्याकडे कोणी ताक घेतले असेल वाटत नाही आणि त्यामुळे ति बिचारी जेवली कि उपाशी झोपली हे देखील माहिती नव्हते त्यामुळे आज्जीला उठवुन जेवलीस का विचारले तर तिने तुमच्याकडे काही आहेका म्हणून विचारले मग तिला एका ताटात जेवण दिले त्या बिचारीने ताटात होते तेवढे संपवून ताट घासायला निघाली परंतु तिच्या नजरेतून दिसत होते कि आजूनही पोट भरले नाही परंतु मागणार कस तेव्हा तिला पोटभर जेवण्याचा आग्रह केला. तोपर्यंत जिथे जागा मिळेल तिथे आमची सगळी मंडळी झोपली होती. आमच्या तिघांसाठी झोपायला जागा शोधण्यात व्यस्त असतानाच एकाने सांगितले त्या जागेवरचे तिघे गेले. चला देवच पावला असे समजून आम्ही तिघांनी आमच्या ब्यॅग त्याठिकाणी नेवून ठेवल्या आणि तिथेच पथारी पसरली. सकाळी लवकर उठून सूर्योदय बघायला जायचा विचार करुन झोपेच्या आधीन झालो.
शिलालेख
दोन तटबंदी मधील व्याघ्र मुख
दोन तटबंदी मधील वाट
दुर्गविहार चे दुर्गवीर
संजीवनी माची
तसा राजगड चार टप्यात विभागला जातो.
१. बालेकिल्ला
२. पद्मावती माची
३. संजीवनी माची
४. सुवेळा माची
पहिल्या दिवसात पहिले तीन टप्पे पार केले होते. सुवेळा माची वरुन सूर्योदय छान दिसतो म्हणून तो भाग आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे उठून बघायचे ठरवले होते. परंतु पहाट होवून सुर्यदेव आमच्या पाठीवर कधी आला हे कळलेच नाही. निवांत उठून चहाचे घोट रिचवुन आम्ही नंतर सुवेळा माचीच्या दिशेने निघालो. जाताना थेट सुवेळा माची गाठली तिथे एक ग्रूप फोटो झाला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
बरेच जण थकले होते परंतु डुबा बघायचा होता. कारण डुबा वरुन राजगड अगदी सुरेख दिसतो. त्यामुळे डुब्याच्या वाटेला लागलो. परंतु वाट खूपच निसरडी होती त्यामुळे सागळ्यांनी चारही पायांचा पुरेपूर उपयोग करत डुबा गाठले.
फोटो झूम करून पहावा
डुब्यावरुन आजूबाजूचा सगळा परिसर न्याहाळून पुढे गुंजवणे दरवाजाच्या दिशेने निघालो. गुंजवणे गावातून दोन वाटा गडावर येतात. एक चोर दरवाजातुन ज्या वाटेने आम्ही रात्री आलो होतो. तर दुसरी गुंजवणे दरवाजाची. हि वाट घनदाट जंगलाची असल्याने या वाटेने जास्त कोणी येत नाही. गुंजवणे दरवाजा बघून आम्ही थेट पद्मावती माची गाठली. आणि नाष्ट्याची तयारी केली. नाष्टा करून पुन्हां काल उचलून आणलेले ओझे पाठीला आडकवले आणि थेट गुंजवणे गाव गाठले.
तिथे पुरोहीत काकांकडे जेवणाची सोय होती तिथे येउन फ्रेश होवून ब्राम्हणी पध्दतीच्या जेवणावर ताव मारला आणि थेट गाडी कडे धाव घेतली.
सुवेळा माचीवरील नेढे
फोटो झूम करून पहावा
डुब्यावरुन आजूबाजूचा सगळा परिसर न्याहाळून पुढे गुंजवणे दरवाजाच्या दिशेने निघालो. गुंजवणे गावातून दोन वाटा गडावर येतात. एक चोर दरवाजातुन ज्या वाटेने आम्ही रात्री आलो होतो. तर दुसरी गुंजवणे दरवाजाची. हि वाट घनदाट जंगलाची असल्याने या वाटेने जास्त कोणी येत नाही. गुंजवणे दरवाजा बघून आम्ही थेट पद्मावती माची गाठली. आणि नाष्ट्याची तयारी केली. नाष्टा करून पुन्हां काल उचलून आणलेले ओझे पाठीला आडकवले आणि थेट गुंजवणे गाव गाठले.
धन्यवाद.
दुर्गविहार टिम.
येताना वाटेत एक वाईट बातमी समजली. अरुण सावंत सरांचा कोकण कडा इव्हेंट चालू असताना अपघात झाला आणि ते आता आपल्यामध्ये नाहीत पहिल्यांदा विश्वास नाही बसला परंतु हि बातमी वाऱ्यासारखी आख्या महाराष्ट्रभर पसरली. त्यामुळे राजगड पनवेल प्रवास एकदम सुन्न होता. ट्रेक च्या दोन दिवस आधीच त्यांच्या सोबत बोलणे झाले होते ते शब्द कानात वाजायला सुरुवात झाली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
💐अरुण सावंत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐





















टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा