हरिश्चंद्रगड....


एक तपोभूमी, भटक्यांची पंढरी, सह्याद्रीचा मुकुटमणी ही सगळी विशेषणं कुणासाठी वापरली जातात, असा प्रश्न विचारला, तर हरिश्चंद्रगड हे एकमेव नाव समोर येतं....

गडद अंधारी रात्र,
भयान शांतता,
किर्रर्रर्रर्र काळोख,
प्रत्येक पावलास येणारा पाला-पाचोळ्याचा आवाज,
आणि समोरून साद घालणारा हरिश्चंद्रगड.......


साधारणपणे पहाटे ०३:१५ च्या सुमारास आम्ही खिरेश्वर गाव गाठले. संपूर्ण गाव निद्रेच्या आधीन होते. गावात भयाण शांतता पसरली होती. थोडावेळ थांबून आम्ही ४ वाजता निघण्याचा निर्णय घेतला.
काळोख असल्यामुळे सगळे एकामागोमाग चालत होतो. आणि अचानक समोर दोन वाटा येउन उभ्या राहिल्या काळोख असल्याने कोणत्या वाटेने जायचे काही समजत नव्हते.परंतु , तीन वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा डाव्याबाजुच्या वाटेने गेलो होतो येवढे मात्र नक्की होते आणि तस पण टोलारखींड डाव्या बाजूला असल्याने आम्ही डावीकडील वाट धरली आणि तिथेच आमचा घात झाला. पुढे एकाला एक वाट मिळत गेली आणि आम्ही अजुनच खोलात शिरत गेलो. आणि एका ठिकाणी त्या वाटा सुध्दा दिसेनाशा झाल्या. आता काय करायचे मग पुढचे दोघे वाटांच्या शोधात पुढे सरकले तर बाकीचे एका ठिकाणी थांबून होते. पुढे गेलेल्यांनी आवाज दिला कि पुढे कूच करायचो. अस करत आमची जंगलातून रात्रीची भटकंती चालू होती. मध्येच हिरव्या घोणस (bamboo pit viper) सापाने दर्शन दिले. सुरुवातीला सगळ्यांना हरणटोळ वाटली परंतु प्रथमेश ने फोटो दाखवले तेव्हा समजले कि हरणटोळ नसून घोणस जातीचा विषारी साप आहे. तो त्याच्या मार्गाने निघून गेला आणि आम्ही आमच्या मार्गाने. पुढे आम्ही तोलारखिंडीत मुळ वाटेला लागलो आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.


खिंडीत एका व्याघ्रशिल्पाचे दर्शन झाले. तिथपर्यंत सर्वजण एकत्र येउन थोडी विश्रांती घेऊन पुढच्या वाटेला लागलो. खिंडीतून थोडा पुढे गेलो आणि समोर कातळकडा उभा ठाकला ते बघून सगळ्यांनी डोळे मोठे केले. परंतु चढाई करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता मग आमच्या छोट्या ट्रेकर ने माप ओलांडून पहिले पाऊल टाकले आणि मग तिच्या मागे आमची स्वारी निघाली.


कातळ टप्पा ओलांडून पुढे गेल्यावर उजव्या हाताला दोन गुहांनी आमचे लक्ष वेधून घेतले. त्यात आमच्या बाप-लेकीच्या जोडीने फोटो काढून घेतले आणि पुढे जाऊन सगळे येइपर्यंत थोडी विश्रांती घेतली.


येव्हाना सुर्यदेवाने दर्शन द्यायला सुरुवात केली होती.
सकाळच्या प्रहाराला लोक चहा घेतात आमच्यातले काही महाभाग पहिल्या प्रहारी लिंबू सरबताचे घोट घेत होते. लिंबू सरबताने ताजे-तवाने होवून पुढे मार्गस्थ झालो. पुढे एका झोपडी पासून दोन वाटा जातात दोन्ही वाटा केदारेश्वर मंदिराजवळच जात. परंतु एक वाट गर्द झाडीतून बालेकिल्ल्याच्या बाजूने जाते तर दुसरी वाट बालेकिल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने जाते. आम्ही झोपडीच्या उजव्या बाजूकडील झाडीतील वाट पकडून मार्गस्थ झालो. येव्हेना सकाळचे ८ वाजून गेले होते त्यामुळे कधीतरी येणाऱ्यांनी गडबड करायला सुरुवात केली होती. म्हणून आम्ही ९:४० कि लास्ट लोकल अस त्यांना सांगून चालत होतो. बघताबघता वेळ सरली तरीसुध्दा ठिकाण येते नाही म्हंटल्यावर सगळ्यांनीच आपले बस्थान मांडले आणि मनसोक्त आराम केला आणि थोड्या वेळाने पुढच्या दिशेने निघालो आता मात्र थांबायचे नाही असे ठरवून निघालो आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ असलेल्या हॉटेल (जिथे आम्ही मागच्या वेळी थांबलो होतो) मध्ये आम्ही बस्थान मांडले. त्यांनी चांगल्याप्रकारे आमचा पाहुणचार केला आणि मग कुणाल आल्यावर समजले कि आपली व्यवस्था कोकण कड्यावर केली आहे. तर अम्हालाच लाजल्यासारखे झाले. तिथून आम्ही जायला निघालो तर त्यांनी आम्हाला थांबवले. आणि थोडा आराम करा आणि मंदिरात आरती झाल्यावर महाप्रसाद घ्या आणि मग जा. या लोकांच्यातच काही ति माणुसकी शिल्लक राहिलेली आढळून येते.


पारंपरिक रीत्या वाजत गाजत मंदिरातून देवाची फेरी निघाली. त्याचे दर्शन घेउन आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या बाजूला चाललेल्या महाप्रसादाच्या वासाने देवाकडे सुध्दा लक्ष नव्हेते. आमच्यातल्या एकाने तर सोबतची मंडळी येइपर्यंत सुध्दां धीर न धरता पत्रावळी घेऊन आपले बस्थान मांडले. कुणाल आणि मी बाकीच्या मंडळींना बोलवायला गेलो आम्ही येइपर्यंत सभोवतालच्या मोकळ्या पटांगणावर भलीमोठी एकच पंगत बसली होती.


त्यात आमची मंडळी कोण कुठे बसलेत हे पाहण्यासाठी सुध्दा वेळ नव्हता तेव्हड्यात कुणाल ने दोघांना पत्रावळी आणल्या आणि जागा मिळेल तिथे आम्ही बसलो. समोर पंचपक्वानाच जेवण बघून आता राहवत नव्हते आणि भूक येवढी प्रचंड लागली होती कि वरून सूर्य आग ओकत होता त्याकडे देखील कुणाचे लक्ष नव्हते. पहिल्याच घासागणीत डोक्यावचे केस उभे राहिले आणि कानातून धुर निघाला.  मस्तपैकी चण्यांची झणझणीत भाजी, वरण-भात आणि गुळ घालून केलेली अप्रतिम लापशी. जेवणावर आडवा हाथ मारून आम्ही थांबलेलो त्या हॉटेल मध्ये येउन न लाजता पथारी पसरली. 
आराम करून आम्ही संध्याकाळी ४ वाजता आमच्या ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. जातानाच हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि केदारेश्वर गुफा बघून पुढे मार्गस्थ झालो.
येव्हाना माथ्यावरचा सूर्य बऱ्यापैकी कलला होता त्यामुळे उन्हाची येवढी झळ बसत नव्हती. त्यामुळे आमचे बिराड रमत गमत चालले होते. जणूकाही सूर्य सुध्दा आमच्या सोबत येत होता. आम्ही कोकणकड्या ला पोचताच सूर्यदेवाने सुध्दा आमचा निरोप घ्यायची तयारी केली होती. भास्कर दादांना आम्ही आल्याची वर्दी दिली आणि त्यांच्याकडून टेंट घेऊन टेंट उभारणीच्या तयारीला लागलो. बॅगा टेंट मध्ये ठेवून सगळ्यांनी कोकणकड्याला सूर्योदयाचा निरोप घेण्यासाठी हजेरी लावली. तर मि दिवसभराचा थकवा दुर करावा म्हणून आमच्या छोट्या ट्रेकर ला घेउन आंघोळीची कुठे सोय होते का? याच्या शोधात निघालो. 
सुर्यास्तासाठी सर्वांनी अखंड कोकणकडा व्यापला होता. त्यात आमची मंडळी शोधून आम्ही सुध्दा त्यांना सामील झालो. प्रत्येकाने सुर्यास्ताचे क्षण टिपण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने कॅमेरे सेट केले. आणि सुर्यास्ताचा आनंद घेत एका जागी बसलो.
नंतर जेवण होइपर्यंत आमच्या गप्पा रंगल्या. छोट्यांनी तर घाबरून गोंगाट भरायला सुरुवात केली. गप्पा इतक्या रंगल्या होत्या कि रात्रीचे नउ कधी वाजले समजले सुध्दा नाही. तोपर्यंत जेवण तयार झाले होते. दिवसभर पायपीट करून सगळ्यांनाच कडाक्याची भूक लागली होती. त्यामुळे आम्ही पुढ्यात येइल ते फस्त करत होतो. जेवणासाठी बसलेल्या मंडळींनी आपापल्या सोइनुसार भाकरी, कढी, भात ,भाजी असा आरडाओरडा चालू केला शेवटी मी उठून कोणाकोणाला काय पाहिजे ते वाढायला सुरुवात केली. खाणाऱ्यांची तोंड पन्नास आणि भाकरी बनवणाऱ्या दोन मावश्या यंत्रा प्रमाणे काम करत होत्या. ते आतमध्ये बसून खाणाऱ्याच्या लक्षात येत नव्हते. आतमध्ये जेवणाऱ्याना काही कमी पडूनये यासाठी त्या झटत होत्या. भरपेट जेवल्याची खात्री झाल्यानंतरच सगळ्यांनी आपला मुक्काम त्या जागेवरून हालवला. आणि मग काहींनी गप्पांचे फड रंगवले तर काहींनी आकाश दर्शन चालू केले. तर काहींनी स्वताला निद्रेच्या आधीन केले. 
सकाळ उगवली ती आशिष च्या आवाजाने. सूर्योदय पहायला जायचे होते त्यामुळे तो सगळ्यांना ओरडून ओरडून उठवत होता. कसेबसे करून त्याने सगळ्यांना उठवले आणि आम्ही तारामती शिखराच्या दिशेने निघालो. जातानाच साळगावकरांच पंचांग बघून अंदाज बांधला की सूर्योदय आपल्याला कुठेतरी मध्येच थांबून पहावे लागणार. तरी सुध्दा सगळ्यांची उत्सुकता पाहून तारामती शिखराच्या दिशेने जाताना लागणाऱ्या दोन शिड्या पार करून गेलो आणि समोर सुर्यनारायणाने आपले दर्शन दिले.
जणू सुर्यदेव आमची वाट पाहत थांबले आहेत. मग मध्येच थांबून आम्ही सूर्योदयाचा आनंद घेतला आणि नंतर तारामती शिखराच्या दिशेने निघालो. वातावरण फारसे चांगले नसल्याने शिखरावरुन आजूबाजूचा परिसर नीटसा दिसत नव्हता त्यामुळे थोडीफार टेहाळणी करून पुन्हां आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी येण्यासाठी निघालो. येव्हाना पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. येउन पहिले जठराग्नी थंड केला. मस्तपैकी गरमागरम कांदेपोहे आणि चहा चा आस्वाद घेऊन आम्ही सामानाची आवरा आवर करायला घेतली. सकाळी ११ वाजता आम्ही परतीच्या प्रवासाची सुरुवात केली. येतांना तारामती शिखराच्या पोटात असणाऱ्या सात गुहांमध्ये एका गुहेत भव्यदिव्य अशी आठ फुटी गणेशाची मूर्ती कोरून तिला शेंद्री रंग लावला आहे.
ते बघून आम्ही खिरेश्वरच्या वाटेने निघालो. वाटेत एक व्याघ्र शिल्पाच्या आधी एक कातळ टप्पा लागतो . त्या टप्प्यावरुन उतरत असताना मि, आशिष आणि आमची छोटी ट्रेकर खाली उतरलो आणि एक जोरदार आवाज झाला. क्षणभर काहीच सुचत नव्हते. पहिले प्रशांत ला आवाज दिला कारण तो आमच्या मागे होता. तो हाकेच्या अंतरावर जरी असला तरी  आम्हाला दिसत नव्हता. तो व्यवस्थित आहे हे कळल्यावर जीवात-जीव आला. पुढे येउन त्याच्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. तो आला तेव्हा समजल कि वरच्या टप्प्यातून येणाऱ्या बाईने घाबरून तिच्या हातातील भांड्याची पिशवी वरुन सोडून दिली आणि ती पिशवी याला घेऊन खाली येणारच होती परंतु प्रशांत थोडक्यात वाचला. तो व्यवस्थित आहे याची खात्री करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. आमच्या शिवाय वाटेत कोणीही नव्हते तेवढ्यात वाटेच्या वरच्या बाजूने पाल्याचा आवाज आला म्हणून वरच्या बाजूला बघितले तर एका वानराने एक भलीमोठी दगड आमच्या दिशेने ढकलून तो पळून जाताना दिसला. मनोज्ञाला मागे ओढून आम्ही सगळे जागेवरच थांबलो. ती दगड एका झाडाला अडकून थांबली तेव्हा कुठे आम्ही पुन्हा पुढच्या दिशेने निघालो. 
साधारण दुपारी दोन वाजता आम्ही खालच्या गावात पोहोचलो. परंतु मागे राहिलेल्यांचा काही पत्ता नव्हता म्हणून आम्ही एक झाड बघून आमची पथारी पसरली. साधारणपणे तासाभरा नंतर मागे राहिलेल्यांनी येउन आम्हाला उठवले. आणि आमचा मोर्चा गाडीच्या दिशेने वळाला.
आणि पुन्हां एकदा खिरेश्वर ते पनवेल बसचा प्रवास सुरू झाला.

मुडदुस होऊनये म्हणून सगळ्यांना सकाळच्या कोवळ्या उन्हात वाळत घातलेत.

महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.

टिप्पण्या

  1. Hahaha 9.40 chi local.... Guari special 😆😆😆😂
    Well written Manoj da 😁

    उत्तर द्याहटवा
  2. खूप भारी , खूप छान लिहिले आहे, खरं तर हरिश्चंद्रगड हे माझे स्वप्न आहे बघू कधी पूर्ण होतेय.
    ब्लॉग वाचनात मी स्वतः त्या ट्रेक मध्ये असा भास सारखा होत होता
    खास करून तुम्ही वाट चुकलात , घोणस दिसला तेव्हा, त्या बाई ची पिशवी पडली तेव्हा आणि माकडाने दकडं टाकला तेव्हा अंगावर शहारे आले होते
    खूप छान 👌👌👌👍👍
    पुढच्या ट्रेक साठी शुभेच्छा.
    तुझ्या मुलीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, केवळ तिच्या मुळेच मी कळसुबाई शिखर चढू शकलो हे सत्य आहे

    उत्तर द्याहटवा
  3. खूप भारी , खूप छान लिहिले आहे, खरं तर हरिश्चंद्रगड हे माझे स्वप्न आहे बघू कधी पूर्ण होतेय.
    ब्लॉग वाचनात मी स्वतः त्या ट्रेक मध्ये असा भास सारखा होत होता
    खास करून तुम्ही वाट चुकलात , घोणस दिसला तेव्हा, त्या बाई ची पिशवी पडली तेव्हा आणि माकडाने दकडं टाकला तेव्हा अंगावर शहारे आले होते
    खूप छान 👌👌👌👍👍
    पुढच्या ट्रेक साठी शुभेच्छा.
    तुझ्या मुलीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, केवळ तिच्या मुळेच मी कळसुबाई शिखर चढू शकलो हे सत्य आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट