महाराष्ट्रातील एव्हरेस्ट.....

 

SMS
Kidhar ja rahi ho?
Kalsubai...
Wo kidhar padtahe?..... 
    असे काहीसे संवाद आमच्या सोबत येणाऱ्या रुपाली मॅडमला त्यांच्या मैत्रीणीने विचारले. मी म्हणतो महाराष्ट्रात राहून जर कळसूबाई शिखर माहिती नसेल तर जीवन व्यर्थ आहे असो.
        ठरल्या वेळेत नेहमीच्या जागी सगळे जमा झालो परंतु यावेळी नेहमीची बस नसल्याने बसवाल्याने उशीर केला आणि ठरल्या वेळेपेक्षा तब्बल अर्धा तास उशीरा हजेरी लावली. गणेशाच्या गजरात रात्री ११ च्या सुमारास आम्ही बारी गावाच्या दिशेने वाटचाल सुरू केली (बारी हे कळसूबाई शिखराच्या पायथ्याचे गाव). जातांना सगळ्यांनी आपापल्या सोइनुसार बसचे स्टॉप ठरवून घेतले होते. त्यानुसार एक एक जण आमच्यामध्ये सामील होत गेले. राहिलेली सगळी मंडळी आम्हाला कल्याण ११:३० ला भेटणार होती परंतु आम्हीच उशीरा निघाल्याने ठरलेल्या वेळेत कल्याणला पोहोचणे शक्य नव्हते त्यामुळे कल्याणला येणाऱ्या लोकांचे फोन यायला सुरुवात झाली.
रात्री १२ च्या सुमारास सगळ्या मंडळीना घेऊन पुढील वाटचाल सुरू झाली. बस वेळेत न आल्याने पुढील सगळे वेळापत्रक कोलमडून पडले होते. साधारणपणे सकाळी ४:३० च्या सुमारास थंडीने गारठलेल्या बारी गावात आम्ही प्रवेश केला. 
          बस मधून उतरून गावाच्या सुरुवातीला असलेले कळसूबाई हॉटेल गाठले. मामांना उठवून आमच्या नाष्ट्याची सोय करायला सांगितली आणि बाकीचे आपापल्या सोइनुसार वजन हलके करून घेतले उगाच ट्रेकमध्ये व्यत्यय नको. साधारण तासाभरात मामांनी आम्हाला नाष्टा बनवून दिला. नाष्ट्याची प्याँकेट बनवून सगळ्यांना दिले. थंडीत कुडकुडत गरमागरम चहाचे घोट घशाखाली उतरवले. ठरलेल्या वेळेपेक्षा आम्हाला साधारण तासभर उशीरा झाला होता.
         छोटीशी ओळख परेड घेऊन आम्ही सकाळी ६ वाजता ट्रेकचा श्री गणेशा केला. आमच्या पुढे नाईट ट्रेक करणारे बरेच ग्रूप होते. किर्रर्र काळोखात त्यांच्या ब्याट्रीचा प्रकाश मध्ये मध्ये दिसत होता. काळोखात ट्रेक करायचा असल्याने सगळ्यांना ब्यॉट्री घेण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या होत्या तरीही काही महाभाग मोबाईल च्या भरवशावर आले होते. नेहमी प्रमाणे ट्रेक लीड करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली तर राहिलेले सगळे गोळा करून आणण्याचे काम कुणाल च्या खांद्यावर होते.
ट्रेकला आलेले छोटे ट्रेकर आणि बाकीचा गोतावळा घेऊन पुढे मार्गस्थ झालो.


अंधारी वाट...

बऱ्यापैकी अंधार असल्याने माझ्या मागे एका रांगेत टॉर्च चा प्रकाश दिसत होता.  गावातून निघाल्यावर कळसूबाईचे माचीवर एक मंदिर आहे त्या मंदिराजवळ पोहोचलो आणि मागचे सगळे सोबत आहेतना ते पाहून शेवटचा शिलेदार आल्यावर आम्ही पुढे मार्गस्थ झालो.



वाट आजून बाकी आहे.

ट्रेक च्या सुरुवातीला माझ्यासोबत असणाऱ्याची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली होती. जरा बऱ्यापैकी उजेडल्यावर एका ठिकाणी थांबून मागचे कुठे आहेत याचा अंदाज घेतला परंतु त्यांच्यामध्ये आणि आमच्या मध्ये बराच ग्याँप पडला होता त्यामुळे थोडावेळ विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ झालो. सोबत असणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू कमीकमी होत चालले होते म्हणून एक चांगली



जागा बघून नाष्ट्यासाठी थांबायचा निर्णय घेतला. जेणेकरून सगळे एकत्र येतील. सगळे आल्यावर समजले कि कळसूबाईला आलेल्या पाहुण्यांचे माकडांनी जंगी स्वागत केले. थंडी असल्याने लहानग्यांनी बाजूला असलेल्या शेकोटीचा आसरा घेतला. धुक्यामुळे सूर्यदेवाने सुद्धा आमच्याकडे पाठ फिरवली होती त्यामुळे बऱ्यापैकी गारवा जाणवत होता.



कडाक्याच्या थंडीत शेकोटीची उब.

भरपेट नाष्टा करून आम्ही पुढच्या दिशेने मार्गस्थ झालो. आता मात्र माझ्या सोबत असणाऱ्यांची संख्या बरीच कमी झाली त्यामुळे आम्ही वेग कमी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तीन शिड्या पार करून विहिरी जवळ आलो तर त्याठिकाणी जत्रा भरल्यागत जाणवत होते. 


शिखरावरुन दिसणारे टेंट.

कदाचित हे लोक रात्री येउन टेंट लाऊन राहिले असावेत. त्यांच्या मधून कशीबशी वाट काढत पुढे सरकलो. शेवटच्या शिडी च्या आधी एक छोटा शॉर्टकट मारून शिडीच्या पायथ्याशी निघालो तर एक ग्रूप खाली उतरत होता मग आम्ही बाजूला थांबून तो ग्रूप उतरून गेल्यावर आम्ही शेवटची शिडी चढून ८ वाजून ५५ मि. कळसूबाई शिखर सर केले.....


हळूहळू आमच्यातले एक एक जण यायला सुरुवात झाली. शिखराच्या आजूबाजूचा परीसर धुक्याने झाकला होता त्यामुळे इतरत्र न डोकावता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर टेहाळला इतक्या थंडीत सुध्दा बिचारे पेढेवाले, पूजेचे सामान विक्रेत्यांची लगबग चालू होती.




      त्यातच सगळ्याच लक्ष वेधून घेतले ते कळसूबाई मंदिराच्या समोर बसलेल्या एका चित्रकाराने. त्याने कळसूबाई मंदिराचे हुबेहुब चित्र रेखाटले होते. नंतर त्याची वही पाहिली तर समजले कि तो जिथेजिथे जातो तिथले चित्र रेखाटुन आपल्य संग्रहि ठेवतो. आमची सगळी गर्दी त्याच्या भोवताली जमा झाली होती.



        सगळे आल्यानंतर आरती ची सुरुवात झाली. आरती साठी सगळेच विद्वान पंडित असल्याने मोठ्या थाटात आरतीची सुरुवात झाली. संकष्टी पावावे पासून ते थेट घालीन लोटांगण पर्यंत सगळ्यांनी सुर धरला होता. मला तर वाटले आता सगळे लोटांगण घालतच उतरणार कि काय. आरती मॉडर्न असल्याने प्रसाद सुद्धा तसाच मॉडर्न होता.


      आरती नंतर कुणाल ने सगळ्यांना थोडक्यात कळसूबाईची कथा सांगितली आणि एक ग्रूप फोटो काढल्यानंतर १०:३५ ला पुन्हां परतीच्या प्रवासाला लागलो. 
       येताना मात्र न थांबता उतरायचे असे मनोज्ञाने ठरवले परंतु सगळ्यांचा विचार करता ते शक्य नव्हते परंतु उतरताना ति पहिल्या शिडी पासून पुढे निघून गेली ते तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यामुळे मला सुद्धा तिच्यामागे यावे लागले आणि माझी जागा अतुल ने घेतली. आरती म्हटल्या प्रमाणे बरेच जण लोटांगण घालत उतरताना दिसत होते. तर पिकनिक म्हणून दुसऱ्या ग्रूप सोबत आलेल्या जोड्यांनी तर उचलून उतरवायचे बाकी ठेवले होते. 
    

     मनोज्ञा आणि माझा १०:३५ ला सुरू झालेला परतीचा प्रवास १२:०० ला संपला. त्यानंतर हळूहळू एकएक जण येतांना दिसले. मंदिरा जवळ वाट भरकटल्याने आमच्यातले कोणी कोणी तर आख्या गावाला प्रदक्षिणा घालून आले तर कोणी आम्ही थांबलेलो त्या घराच्या मागच्या बाजूने प्रकट झाले. 
आमचे जेवण आटोपले तरी कुणाल चा पत्ता नव्हता. शेवटी मामाच्या घरातून चटई मागितली आणि आम्ही थोडावेळ ध्यानस्थ झालो.


एकसाथ सावधान...

२:३० च्या आसपास कुणाल राहिलेल्यांना घेऊन आल्याचे समजले. त्याचे जेवण आटोपल्यानंतर सगळ्यांचे अनुभव ऐकून पुढील ट्रेकची तारीख व ठिकाण सांगून ट्रेकची सांगता केली आणि ४:०० वाजता परतीचा प्रवास चालू झाला.

दुर्गविहार चे दुर्गविर...

धन्यवाद.


महत्वाची सूचना:गडकिल्ल्यांवर फिरताना कृपया खालील चित्रामध्ये दिलेले संकेत काळजीपूर्वक पाळा आणि आपल्याला, सह्याद्रीला, गडकिल्ल्यांना आणखी हानी होण्यापासून वाचवा.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट