नारोशंकर मंदिर

गोदावरी काठावर वसलेले हे मंदिर नागरी आणि परंपरागत स्थापत्यशैलीच्या मिलाफाचे उत्तम उदाहरण आहे. नारोशंकर राजेबहाद्दूर यांनी या मंदिराचे निर्माण केल्यामुळे हे मंदिर नारोशंकर याच नावाने प्रसिद्ध झाले.


श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांची वसईच्या किल्ल्यावरून १७३९ मध्ये सुटका करण्यात आली. त्या लढाईमध्ये मराठ्यांनी दाखवलेले शौर्य अभूतपूर्व होते. त्याचे स्मरण रहावे म्हणून नारोशंकर यांनी वसईहून येतांना ही प्रचंड घंटा सोबत आणली. नारोशंकर मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच आजही ही घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक बनून कायम आहे.
नारोशंकराची घंटा
असं म्हणतात, त्या काळात हे मंदिर उभारण्यासाठी १८ लाख रुपये खर्च झाले.मंदिराच्या अगदी जवळून गोदावरी वाहते. हे ध्यानात घेऊन पुरापासून आणि लोकांनी गजबजलेल्या गोदावरीच्या घाटांपासून मंदिराची शांतता अबाधित राखण्यासाठी एक भरभक्कम दगडी भिंत मंदिराच्या सभोवती उभारली आहे.
अनेक उपशिखरांनी वेढलेले मंदिराचे शिखर दुरुनही लक्ष्य वेधून घेते. मंदिराच्या सभोवती असणार्‍या भिंतीला वेढणारा अक्षय नाग भिंतीवर कोरला आहे. अक्षय नाग शिवमंदिराच्या भिंतीवर कोरला जातो. हा नाग शिवाचे काळावर असलेले नियंत्रण दर्शवितो. सभामंडपाचे बांधकाम काहीसे हेमाडपंथी पद्धतीचे आहे. तर मंदिराच्या चारही बाजूना असणार्‍या छत्र्या रजपूत शैलीची आठवण करून देतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर घंटेसाठी केलेली महिरपही राजपूत पद्धतीची आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थान आणि गुजरातमधून कारागिर खास बोलविण्यात आले होते असं म्हणतात.
मंदिराच्या मागच्या बाजूला दोन भव्य हत्ती कोरले आहेत. पूर्वी इथे बगिचा असावा. कालौघात तो नष्ट झाला असला तरी त्याच्या खुणा अजूनही जाणवतात. बगिचातले छोटे दगडी रस्ते वगैरे आजही आहेत.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट