टाहाकारीचे यादवकालीन श्री जगदंबा मंदिर

     नगर जिल्ह्यातला अकोले तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हरिश्चंद्रगड,रतनगड,अलंग,कुलंग आणि मदन असे एका पेक्षा एक सरस किल्ले , कळसूबाईसारखे सर्वोच्च शिखर ,भरपूर पाऊस आणि सुंदर मंदिरे या सगळ्यांनी अकोले तालुका समृद्ध झाला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर आणि अकोलेचे सिद्धेश्वर मंदिर या देखण्या मंदिरांच्या पंक्तीमध्ये टाहाकारीचे श्री जगदंबा मंदिर येते.इसवी सनाच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी

  अकोलेच्या वायव्येला समशेरपूर पासून साधारण २७ किमी अंतरावर आढळा किंवा आरदळा नदीच्या काठावर टाहाकारी गाव वसलेले आहे. टाहाकारी नावाच्या उत्पत्तीच्या दोन दंतकथा इथले गावकरी सांगतात. हा परिसर दंडकारण्याशी संबधीत असल्याने दंतकथा सुद्धा रामायणाशी निगडित आहेत.पहिली कथा म्हणजे रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जिथे टाहो फोडला ते ठिकाण म्हणजे टाहोकारी नंतर टाहाकारी म्हणून प्रसिद्धीस आले.दुसरी कथा अशी कि प्रभू राम सीतेचा शोध घेत या परिसरातून फिरताना शिव-पार्वती आकाशातून विहार करत होते, रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्याचे ठरवले.सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली पण रामाने पार्वती मातेला ओळखले आणि वंदन केले. तेव्हा पार्वती आपल्या मूळ जगदंब रूपात येथे प्रकटली आणि तेथे हे जगदंबा मंदिर बांधले गेले.


आताचे मंदिर 


१८८० मध्ये हेन्री कौसेन्स यांनी काढलेला फोटो 
        टाहाकारी गावात नदीवरील पूल ओलांडत असताना ३ पांढरे कळस दिसतात, मंदिर जवळ आल्याची ती खूण आहे.मंदिराजवळ आल्यावर मंदिराभोवती सात फूट उंच तटबंदी दिसते. या तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपण मंदिर परिसरात प्रवेश करायचा.मंदिर उत्तराभिमुक आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकात अडकवले जातात.

 या मंदिराचे मुख्य मंडप, मंडप,अंतराळ आणि गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच जोत्यावर(अधिष्ठान ) उभे आहे. जोत्यावर पुष्पपट्टी आणि पद्मपट्टी कोरलेली आहे.मंदिर पूर्ण चिऱ्यामध्ये बांधलेले असून त्याची बांधणी हेमाडपंथी म्हणजे दगड एकमेकात अडकवलेले आहेत.



जोत्यावरील पुष्पपट्टी आणि पद्मपट्टी
        










मुखमंडपात भिंतीलगत दगडी आसनांची व्यवस्था केलेली आहे.मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पही आहेत
मैथुन शिल्पे 


     



अप्रतिम दगडी झुंबर 















  मंडपाचे छत करोटक प्रकारचे आहे. करोटक म्हणजे करवंटी. नारळाची करवंटी पालथी घातली तर आतून जशी गोलाकार दिसेल तसेच इथे आतून गोलाकार छत बनवले आहे.मंदिराच छत ७२ खांबांवर तोललेल आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्प, किर्तीमुख, भौमित्तीक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत.मुखमंडपातून सभामंडपात प्रवेश केल्यावर मंडपाच्या छताला एकात एक गुंफलेली वर्तुळे व मध्यभागातून खाली लोंबणारे दगडी झुंबर अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फुल,सिंह आणि आठ अप्सरांची मूर्ती कोरलेल्या आहेत.

सभामंडपातील अंतराळ आणि कोरीव खांब 





























मंदिराच्या सभामंडपाला पूर्व,पश्चिम आणि दक्षिण या तीन दिशेला गर्भगृहे आहेत,या रचनेला त्रिदल रचना म्हणतात.मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.अंतराळात काही देवकोष्टकेही आहेत.मुख्य गर्भगृहाच्या दरवाजावर सुंदर नक्षीकाम केले असून शीर्षपट्टीवर देवीची संकेतमुर्ती आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि अठरा हातांच्या जगदंबेची लाकडी मूर्ती आहे.अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली आहेत.श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून महिषासुरमर्दिनी अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी तर पश्चिमेस भद्रकाली देवीची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर उजव्या बाजूस कामाक्षी देवीचे शिल्प तर डाव्या बाजूस कुबेराचे शिल्प कोरले आहे.

नक्षीकाम केलेले गर्भगृहाचे प्रवेशद्वार 
श्री जगदंबा माता 

















































मंदिराचा अंतर्भाग पाहुन मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनात दुमडलेला बाह्यभाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाड्यांमधे सुरसुंदरींच्या मुर्ती बसवलेल्या आहेत.
सुरसुंदरी :

पुत्रवल्लभा 
१. पुत्रवल्लभा :आईने बाळाला डाव्या हातावर घेतले आहे आणि घरंगळून जाऊ कि काय या भीतीने बाळाने तिच्या गळ्यातील मुक्ताहारास बाळमुठीत धरून ठेवले आहे.देव आणि भक्त यातले नाते माता आणि पुत्र त्यांच्या नात्याप्रमाणे आहे असे इथे सूचित करायचे आहे.

शुकसारिका 









२.शुकसारिका : अतिशय लोकप्रिय सुरसुंदरीचे शिल्प. सुरसुंदरीच्या डाव्या हातातील वाडग्यातील खाद्य खाण्यामध्ये उजव्या हातावरील पोपट गुंतला आहे.













दर्पणा(केतकीभरणा) 
३. दर्पणा(केतकीभरणा ): स्वतःचे नटणे नीटनेटके झाले आहे कि नाही हे आरशात न्याहाळणाऱ्या सुरसुंदरी म्हणजे दर्पणा. येथे सुरसुंदरी विपुल केशसंभारात फुल खोचताना दिसतेय. पण हिला केतकीभरणा म्हणायचे.








.४.पत्रलेखिका : पत्र लिहिणाऱ्या सुरसुंदरीच्या अनेक प्रतिमा मंदिरावर व इतरत्र आढळतात. विपुल केशसंभाराचा बुचडा हिच्या उजच्या खांद्यावर विसावलेला आहे. पाय थोडासा दुमडून डाव्या हातावर धरलेल्या भूर्जपत्रावर उजव्या हाताने धरलेल्या लेखणीने लिहिण्यात ती गढून गेलेली आहे
पत्रलेखिका 
















स्त्री आणि माकड 





५. स्त्री आणि माकड : हे कलाकारप्रिय शिल्प अनेक मंदिरांवर शिल्पांकित केलेले आढळते.या शिल्पामध्ये वस्त्र पकडलेल्या माकडाला हाकलून लावण्याचा प्रयत्न स्त्री करत आहे. येथे अस्थिर माकडाच्या रूपाने मनाची चंचलता दाखवण्याचा कलाकाराचा प्रयत्न आहे.पवित्र मंदिरात प्रवेश करताना भक्तांनी तृष्णा वा इच्छा बाजूला ठेवायची असते.





















कुंडल धारण 
६.कुंडल धारण : उजव्या कानाच्या पाळीत वर्तुळाकृती अलंकार बसवताना आपले दोन्ही हात तिने कानाजवळ नेलेले आहेत.त्यातही उजव्या कानापर्यंत पोचणारा,छातीवरून जाणारा तिचा डावा स्तन त्या हाताखालून डोकावताना दिसतो.ती पाय दुमडून उभी असल्यामुळे डाव्या पिंढरीला उजवा पाय छेदतो व साहजिकपणे त्यावरील वजन कमी होते. ही सुरसुंदरी देखणी नसली तरी ती आपले लक्ष वेधून घेते ते तिच्या लयबद्ध मोहक हालचालीमुळे.


आलसा 

७. आलसा किंवा लीलावती : ही नुकतीच झोपेतून उठलेली असल्याने दोन्ही हात डोक्यावर नेऊन आळोखेपिळोखे देऊन आलेला आळस दूर करायचा प्रयत्न करत असते.
















स्त्री आणि विंचू 

८. स्त्री आणि विंचू : अनेक देवळांच्या बाहेरच्या भिंतीवर एक स्त्री विंचू मांडीवर चढतो आहे असे पाहून त्याला दूर ढकलण्यासाठी वस्त्र झटकते आहे असे दाखविलेले असते.विंचू हा वासनेचे प्रतीक आहे.त्याचे विष जसे चढते तसेच वासनेचेही आहे. वासनग्रस्त मनुष्यास तिचे शमन करणे दुष्कर ठरते.

कर्पूरमंजरी 

 
:
९. कर्पूरमंजरी : न्हाऊन झाल्यावर केसातून पाणी पिळून काढण्याच्या अवस्थेत ती नेहेमी शिल्पकिंत केली जाते. आपल्या दोन्ही हाताने ती ओले केस पिळून काढत आहे. असे करताना तिच्या उंचावलेल्या डाव्या बाहुखालून उसळून पुढे आलेला स्तन दाखवून कलाकाराने शिल्पात स्वाभाविकता आणली आहे.




रती 

१०.रती : या शिल्पात ती पाय दुमडून उभी असून इक्षुदंडाचे धनुष्य तिने मांड्यात सहजगत्या धरल्याचे दिसते.त्रिभंगात हि उभी असून तिच्या उजव्या हातात बाण आहे.अशा चाल करून जायच्या तयारीत असतानाही प्रसाधन करण्यास ती विसरत नाही. तिच्या डाव्या पायाला आळिते लावत असलेली तिची दासी बाजूला दिसते आहे.माथी तिच्या करंडमुकुट आहे.

















डालमालिका 






  ११. डालमालिका : या शिल्पात उजव्या हाताने झाडाच्या फांदीला धरून ती दिमाखात उभी आहे.आंबाच्या झाडाखाली ती उभी असून झाडाने तिच्यावर जणू काही छत्र धरले आहे,अशी फळभाराने लगडलेल्या फांदीची योजना कल्पक शिल्पीनी केली आहे.




विदेशी सुरसुंदरी 

 १२. या शिल्पात सुंदरीच्या अंगामध्ये युरोपियन पद्धतीचा कोट घातलेला दिसत आहे 





चामुंडा 
या सर्व मूर्ती पाहत असताना आपण देवकोष्टकातील मूर्ती बघणे विसरायचे नाही. बाहेरील बाजूस तीन कोनाडे म्हणजे देवकोष्टे आहेत. एका देवकोष्टकात चामुंडेचे शिल्प आहे.चामुंडा हे देवीचे अक्राळविक्राळ रूप आहे. हडकुळे शरीर,पोटावर विंचू ,गळ्यात रुंडमाळ ,हातातल्या दंडावरची कवटी आणि डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना ही मूर्ती दाखवली आहे.


चामुंडा मूर्तीच्या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी मकरमुख कोरलेले आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.
मकरमुख 



नृत्य करणारा शंकर 


गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती आहे.त्या मूर्तीच्या पायाशी डमरू वाजवणारा गण तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे.या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा,विष्णू आणि महेश कोरलेले आहेत.












शंकर 




पश्चिमेच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू,तलवार आणि त्रिशूळ घेतलेली शंकराची मूर्ती कोरलेली आहे. मूर्तीचा डावा  हात तुटलेला आहे.






पर्यटक ,श्रद्धाळू आणि मंदिर अभ्यासक यांसाठी अकोले तालुक्यातील हे मंदिर पर्वणी आहे. पुणे-मुंबई वरून एका दिवसात पाहून येता येते.  या परिसरामध्ये मिळणारे कमी गोड अस्सल खव्याचे पेढे आवर्जून खाल्ले पाहिजेत.
एकूणच आमची अचानक ठरलेली टाहाकारीची भेट अविस्मरणीय होती.



----पुढच्या भागात अकोले गावातील गंगाधरेश्वर मंदिराची माहिती जाणून घेऊयात.



संदर्भ :  सुरसुंदरी - गो.ब .देगलूरकर 














































टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट