दुर्ग दुर्गेश्वर रायगड. (भाग दुसरा.)

दिवस दुसरा....
    भल्या पहाटे दुर्गविहार चा गजर वाजला. दुर्गविहार चा गजर म्हणजे प्रथमेश भल्या पहाटे :४५ वाजताच उठला आणि सगळ्यांना आवाज देत सुटला. हळूहळू एकएक जण उठायला सुरुवात झाली. रात्री झोपण्या आधी सगळ्यांना दिलेल्या सूचनांचे पालन करत सगळ्यांनी आवरा आवर करायला सुरुवात केली तोपर्यंत ताईंनी गरमागरम पोहे आणि मसालेदार चहा आणून समोर ठेवला. पोहे शेवटी रहिलेल्यांनी घेतलेही नव्हते तोपर्यंत पहिले भेटलेले त्यांनी पोहे आहेत कारे अरे मला लिंबू हवा आहे असे आवाज द्यायला सुरुवात झाली


        गरमागरम पोहे आणि मसालेदार चहा चा नाष्टा करून आमचा मोर्चा कुशावर्त च्या दिशेने वळाला. वाटेत जाताना भूमीगत पाणी व्यवस्था, भूमीगत गटारे निदर्शनास पडतात. आपल्याला वेधशाळा आणि पर्जन्यमापक यांच संगणकीय ज्ञान आपल्या आत्ताच्या च्या काळात माहिती झाले असले तरी महाराजांच्या रायगडावर ही सगळी व्यवस्था त्याकाळी देखील होती. संगणक त्या काळी नसला तरी देखील हवामानाचा अंदाज आणि पावसाचे मोजमाप त्याकाळी सुध्दा होत असे.

       ते पाहून आम्ही कुशावर्त च्या दिशेने वळालो. कुशावर्त जर नीट निरखून पाहिला तर त्या काळात किती विचार पूर्वक त्याचे बांधकाम केले आहे याचा अंदाज बांधता येतो.


. तलाव भरून वाहिले तर कचरा जाऊ नये म्हणून दगडी कोरीव काम करून बसवलेली जाळी.
. तलाव भरून वाहून जाऊ नये यासाठी बाहेरील बाजूस खालच्या बाजूस पाणी वाहून जाण्यासाठी केलेली गोमुखी व्यवस्था
. व्यवस्तित पाहिले तर तलावाच्या भिंतीमध्ये तांब्याचे पाईप निदर्शनास पडतात त्याचा नक्की कशासाठी वापर होत असेल याचा अंदाज बांधता येत नाही


     कुशावर्त च्या उजव्या बाजूने एक वाट खालच्या दिशेने जाते. वाट थोडी निसर्डि आहे. त्या वाटेने वेडीवाकडी वळणे घेत पुढे गेल्यावर वाघ दरवाजा लागतो. वाघ दरवाजाची रचना सुद्धा महादरवाजा प्रमाणे गोमुखी आहे. अस म्हणतात रायगडाला जेव्हा वेढा पडला होता तेव्हा राजाराम महाराज याच दरवाजातून निसटून जाण्यात यशस्वी झाले होते. दरवाजाच्या डाव्या बाजूला एक धबधब्याचि वाट आहे त्या वाटेने कोणी शत्रू गडावर प्रवेश करुनये यासाठी तेथे तटबंदी बांधली आहे. आणि पाणी वाहून जाण्यासाठी तटबंदीच्या खालच्या बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी जागा केली आहे.

दरवाजातून उजव्या बाजूला पोटल्याचा डोंगर दिसतो. जेव्हा इंग्रजांनी रायगडावर हल्ला केला तेव्हा याच पोटल्याच्या डोंगरावरुन रायगडावर तोफा डागल्या होत्या. वाघ दरवाजात बसून आमच्यातली  रायगडाची आणखी माहिती वाढवण्याचे काम प्रथमेश ने केले. तेथून निघण्यापूर्वी वाघदरवाजात शिवगर्जनेचा आवाज घुमू लागला.



        
       तेथून पुढे डाव्या बाजूला असलेल्या धबधब्याच्या वाटेने वरती चढाई केली. तेथे एक पाण्याचे टाके आहे त्या टाक्यात एक सिंह मुख आहे आम्ही आलेल्या ट्रेकर्सना कसले मुख आहे हे विचारले असता त्या सगळ्यांच्या कल्पनेची दाद द्यावी लागेल

      कोणी मगर तर कोणी मासा इथपासून सगळ्या प्राण्यांची उपमा त्या मुखवट्याला देण्यात आल्या. एकाने तर चक्क कुत्र्याचे मुख आहे असे सांगितले त्यावेळेस भारतीय पुरातत्त्व खात्यातून त्याला पुरस्कार द्यावा असे वाटत होते. त्या पाण्याच्या टाक्यातुन आमच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि बारा टाक्याच्या दिशेने निघालो.

            पुढे आमची गाडी बारा टाके मार्गे ब्राम्हण तलाव, जगदीश्र्वराचे मंदिर करत टकमक टोकावर पोहोचली. टकमक टोकावरून महादरवाजाचे सुरेख दर्शन घडते तसेच महादरवाजा पासून चोरदिंडी परियन्तं येणारी तटबंदी आणि बुरूज ही निदर्शनास पडतो. टकमक टोकावरून खरोखरच नावाप्रमाणे टकमक पहावे लागते. त्या काळी टकमक टोकाचा उपयोग शिक्षेसाठी केला जात असे.

नंतर आम्ही टकमक टोकावरून राजमहालाच्या मनोऱ्याच्या दिशेने वळलो  मनोऱ्यावरून गंगासागर तलाव टकमक टोक आणि रायगड चा बराचसा परिसर खूप सुरेख दिसतो. मनोऱ्यामध्ये त्याकाळी कारंजे होते त्याच्या खुणा आजूनही मनोऱ्यामध्ये दिसून येतात. तेथून पुढे पालखी दरवाजा जवळ येउन पोहोचलो. तिथेकाहींना प्रश्न पडले हा पालखी आणि तो मेणा दरवाजाच का? तर राजदरबारातिल राण्या किंवा आष्ट प्रधानांच्या स्त्रियांचे मेणे हे मेणा दरवाजा मधून येत असत तर महाराज किंवा प्रधानमंडळातील पुरुषांची पालखी हि पालखी दरवाजा मध्ये येत असे. दरवाजाच्या पायऱ्यांची खडीचढण असल्याने दरवाजा आधी पालखी ठेवण्यासाठी दोन्ही बाजूस उंचवटे आहेत. हे सर्व पाहीपर्यंत सुर्य कधी डोक्यावर येउन ठेपला हे कळले सुद्धा नाही.


    पालखी दरवाजातुन आमची पालखी थेट ताई च्या घराजवळ जाऊन थांबली. लगेच सगळ्यांचि जाण्याची आवरा आवर सुरू झाली  तेवढ्यात ताईने जेवणासाठी आवाज दिला. भरपेट जेवण आटोपल्यानंतर बरेच जण सुस्थावले. काहीजण तर रायगडावरुन घरी पोहोचले सुध्दा

            थोडी विश्रांती झाल्यानंतर ताईचा निरोप घेउन आम्ही परतीच्या प्रवासाची सुरुवात केली. येताना वाटेत रायगडाची कुलदैवत शिरकाई देवीचे दर्शन घेऊन पुढील वाटचाल सुरू केली

      आज रविवार असल्याने काल येताना जे आमची वारंवार वाट आडवत होते त्यांना देखील आज सुट्टी होती त्यामुळे आमचा उतरतानाचा प्रवास सुखकर झाला. दोन दिवसांच्या भटकंती नंतर बरेच जण थकले होते त्यामुळे कोणी कासवाच्या गतीने चालत होते तर आम्ही सस्याच्या गतीने नाणा दरवाजा गाठला.

      नाणा दरवाजाचि खूपच दुरवस्था झालेली आहे फक्त दरवाजाच्या दोन कमानी शिल्लक आहेत. त्या काळी नाणा दरवाजाने फक्त मोठ्या प्रतिष्ठावान माणसांना येन्या जाण्यासाठिच असे. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी हेन्द्री ऑझेंडर हा इंग्रज आधिकारी गडावर उपस्थित होता तो याच नाणा दरवाजाने आला होता. नाणे दरवाजाचा इतिहास ऐकून पुढे १५ मिनिटांनी आम्ही बस जवळ येउन पोहोचलो. उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम अशी चौदिशाचि रायगडची भटकंती  इथे समाप्त झाली आणि पुन्हां एकदा रायगड-पनवेल बस प्रवास सुरू झाला.






















         मनोज म्हात्रे

      दुर्गविहार पनवेल....



पहिला भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
दुर्ग दुर्गेश्वर रायगड. (भाग पहिला.)





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट