सफर सातवाहनकालीन हडसरची...
नमस्कार
पुन्हा एकदा ट्रेक विषयी थोडं.......
हल्ली गेले २ महिने पावसाळा चालू झाल्यापासून आपणांस खुप साऱ्या वाईट घटना ऐकू येतात. आपण पाहतो सुध्दा. त्या मुळे ट्रेकला जावे की नाही या बद्दल बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम असेल. पण तरी सुध्दा घरात बसेल तो ट्रेकर कसला....?
रोजच्या या दगदगीच्या जीवनात जो जगण्यासाठी प्राणवायू लागतो तो गडावर गेल्याशिवाय मिळत नाही. या गडकिल्ल्यावर गेल्यावर मनाला खुप मोठे समाधान मिळते. असेच सह्याद्री च्या कुशीत भटकंती करत असताना असच एखाद्या कोपऱ्यात शांत बसाव आणि तो सह्याद्री आपल्याशी बोलू लागतो. हे एक ट्रेकरच समजू शकतो.कधी तरी प्रयत्न करून बघा...
बाईक ट्रेक नंतर पुन्हा एकदा ट्रेक ठरला आणि तो म्हणजे "हडसर किल्ला". पण नाव जस जड आहे किल्ला तितकाच चढाईसाठी सोपा अहे. पण किल्ल्याच्या पायथ्याशी प्रवास तितकाच खडतर आहे. पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मालशेज घाट मार्गे आणि दुसरा म्हणजे तळेगाव मार्गे. या ट्रेक ला दोन्ही मार्गाचा प्रवास आमच्या नशिबी आला. चक्क सकाळी ६.३० ला निघालेलो आम्ही तळेगाव मार्गे पोहोचता पोहोचता दुपारी १ वाजला. आयुष्यात पहिल्यांदा दुपारी १.१० ला ट्रेकला सुरुवात केली.
सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. ट्रेकची सुरुवात झाल्यानंतर सर्वांची ओळख परेड झाली नंतर कुणालने सर्वाना किल्ल् माहिती सांगून सर्वांना सूचना दिल्या. लीड कोणी करायचे तेथून शेवटी राहिलेल्याना गोळा करत कोणी यायचे ते सांगून ट्रेक सुरू झला. मधे मधे पाऊस श्रावण सारींच्या रुपाने दर्शन देतच होता. गडाच्या वाटेवर खूपच कढीपत्त्याची झाडे आहेत. पहिला टप्पा चढल्यावर खूपच हवा... हवा
नंतर गडाच्या मागच्या बाजुने चढाई सुरू केली. थोड्या वेळाने वाट संपून पायऱ्याची सुरुवात झाली थोड्या पायऱ्या चढल्यावर समोरच किल्ल्याची तटबंदी दिसली. इतकी सुंदर आणि मुद्देसूद बांधणी होती. ते पाहून मन एकदमच प्रसन्न झाले. पुढे गेल्यावर किल्याचे प्रवेश द्वार लागले. प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं, नळीत खोदलेल्या पायर्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे म्हणजे दुर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्ट्यच आहे.
पायऱ्या पावसामुळे निसर्ड्या झालेल्या होत्या. तीनही दरवाजे चढून वरती गेल्यावर वरती अप्रतिम असे दृश्य होते. धबधब्याचे पाणी वाऱ्याने झोताने पुन्हां वरच्या दिसेने प्रवास करत होते. गड आड बाजूला असल्याने गडावर ट्रेक च्या नावाखाली दारूच्या पार्ट्या आणि पिकनिक करणाऱ्यांची कमी होती.... नव्हती बोललात तरी चालेल, कारण इतर गडानसारखी कुठे ही पाण्याची किंवा दारूची बाटली दिसत नव्हती. हे पाहून बरे वाटले की या सर्वांपासून गड लांब राहिला.
पुढे गेल्यावर महादेवाचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाड्यात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. हे सर्व पाहताना कोणालाही जेवणाची आठवण सुद्धा झाली नाही. ते सर्व पाहुन पुन्हां परतीच्या प्रवासाची सुरुवात केली. गडावरुन खाली उतरायला जवळ जवळ ६ वाजले होते. खालूनच गडाच शेवटच दर्शन घेऊन गाडीत बसलो.
जुन्नर ला येउन भरपेट नाष्टा वजा जेवण करुन परतीच्या प्रवासाला लागलो. येताना माळशेज घाट चालू झाल्यामुळे येताना दुसऱ्या वाटेचाही अनुभव घेता आला. घाटाच्या सुरुवातीलाच एवढे धुके होते की समोर काहीच दिसत नव्हते. त्यात आमच्या बस वाल्याला कदाचित उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला हे माहिती नसावे.... कारण त्याच्या बसला समोर वायफरच नव्हते... !!😓मग कशी तरी दुसऱ्या गाड्यांचा आधार घेऊन घाट उतरायला सुरुवात केली. घाटात कोसळणाऱ्या धबधब्याचे दर्शन होत होते. कसे बसे कल्याण गाठले. आमच्यातली काही मंडळींनी कल्याणला निरोप घेतला. आणि आम्ही पनवेल च्या दिशेने निघालो रात्री १२.४५ पर्यंत पनवेलला पोहोचलो. या वेळी नाष्टा आणि जेवनाची सोय दुर्गविहारने केली होती त्यामुळे ते टेंशन नव्हते. अशा या ३/४ तासाचा ट्रेक आणि जवळ जवळ १२/१४ तसाचा अविस्मरणीय प्रवास. या सगळ्या बद्दल दुर्गविहार चे खुप खुप धन्यवाद.
मनोज म्हात्रे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा